महत्वपूर्ण कागदपत्रे हरवल्यास; ‘हे’ करा
आपली महत्वपूर्ण कागदपत्र हरवली की, होणारी पंचाईत त्रासदायकच असते. नेमकं कागदपत्रे हरवल्यानंतर पुढं काय करायचं? हे आपल्याला बहुदा सुचतचही नाही. नेमकं अशावेळी काय करावं? त्याबद्दल जाणून घेऊयात...
👉 मालमत्तेची कागदपत्रे हरवल्यास...
1) एफआयआर दाखल करा : प्रथमतः कागदपत्रे गहाळ झाल्याची खातरजमा करून घ्या. त्यानंतर लवकरात लवकर पोलिस ठाण्यात रिपोर्ट करणे गरजेचे आहे. यासंबंधी एफआयरची नोंद प्रॉपर्टी मालकाच्या नावाने करणे गरजेचे आहे आणि कागदपत्रे हरवण्याच्या कारणाचा स्पष्टपणे उल्लेख करावा. या एफआयआरची एक प्रत आपल्याकडे सांभाळून ठेवावी कारण प्रॉपर्टीची विक्री करताना खरेदीदार या प्रतची मागणी करू शकतो.
2) जाहिरात देणे : कागदपत्रे गहाळ झाल्यासंबंधी वृत्तपत्रातून जाहिरात देणे आवश्यक आहे. कारण एखाद्या व्यक्तिला कागदपत्रे सापडली तर तो ती कागदपत्रे आपल्याला आणून देऊ शकतो. इंग्रजी आणि हिंदी भाषिक वृत्तपत्रांबरोबरच स्थानिक पातळीवरच्या वृत्तपत्रातूनही जाहिरात प्रसिद्ध करावी. याशिवाय आपल्या नातेवाईकांना गहाळ कागदपत्रांची माहिती कळवावी, जेणेकरून कोणाकडे चुकून कागदपत्रे राहिली असतील तर ती परत मिळू शकतात.
👉 फ्लॅटची कागदपत्रे हरवल्यास :
जर फ्लॅटची कागदपत्रे गहाळ झाली असतील तर एफआयआरच्या आधारावर आपण सोसायटीकडून शेअर सर्टिफिकिटची मागणी करू शकता. यासाठी रेसिडेंट वेलफेअर सोसायटी एक बैठक बोलावून यासंदर्भात चर्चा करते आणि प्रॉपर्टीची कागदपत्रे गहाळ प्रकरणाची चौकशी करते. समाधान झाल्यास एफआयआरच सत्य मानून सोसायटी शेअर सर्टिफिकेट प्रदान करते. याचबरोबर एनओसी म्हणजेच नो-ऑब्जेक्शन सर्टिफिकिटची देखील मागणी करावी.
1) नोटरीकडे नोंदणी करा : यापुढचे पाऊल म्हणजे स्टॅम्पपेपरवर कागदपत्रे हरवण्यासंबंधी शपथपत्र तयार करणे. यासाठी एफआयआर नंबर आणि जाहिरातीत दिलेली सूचना देखील स्पष्ट रूपाने नमूद करावी. ही कागदपत्रे शपथपत्राला कायदेशीर आधार राहिल.
2) सेल डिडची डुप्लिकेट प्रत घ्या : डुप्लिकेट सेलडिड मिळवण्यासाठी एफआयआर, वृत्तपत्रातील जाहिरात, शेअर सर्टिफिकेट आणि नोटरीकडून नोंदणी करून घेतलेले शपथपत्र याच्याप्रती रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जमा करावीत. प्रॉपर्टीच्या कायदेशीर कागदपत्रांसाठी शुल्क देखील भरावे लागते. जर आपले कागदपत्र बँकेच्या चुकीमुळे गहाळ झाले असतील तर आपण भरपाई मागू शकता. घराच्या दस्ताऐवजाच्या सुरक्षेची जबाबदारी बँकेवर असते आणि या चुकीबद्दल आणि हलगर्जीपणामुळे दंडही होऊ शकतो. या संपूर्ण प्रक्रियेनंतर आपण डुप्लिकेट कॉपी घेऊ शकता.
👉 कारची कागदपत्रे हरवल्यास… :
यासाठी देखील आपल्याला पोलिस ठाण्यात रितसर तक्रारी द्यावी लागते. अर्जात मोटारीचे आरसी बुक हरवल्याचा उल्लेख करावा लागेल. गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, मोटार मॉडेल, इंजिन नंबर, चेसीस नंबर, कार मालकाचं नाव आणि पत्ता याचा उल्लेख असणे गरजेचे आहे. यानंतर गहाळ झालेल्या आरसी बुकसाठी पोहोचपावतीची मागणी करू शकता. ही पावती हरवलेल्या आरसीची माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
आरसी बुक कधी हरवले, याची नोंद स्पष्टपणे असावी. या पावतीबरोबर आपण आपले ओळखपत्र, विमा पॉलिसी, रहिवाशी पुरावा, वाहन परवाना, आरसीची झेरॉक्स या प्रती जोडणे गरजेचे आहे. गहाळ झालेल्या आरसीची पावती पोलिस देऊ शकते. यानंतर आपण हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या दस्ताऐवजाप्रकरणी दिलेल्या तक्रारीची प्रत आणि आरसी बुकची झेरॉक्स आरटीओ कार्यालयाकडे जमा करावी.

Comments
Post a Comment